Jammu Kashmir Elections 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Jammu Kashmir Elections) पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. काल 24 विधानसभा जागांवर (Assembly Elections) मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानात सहभाग घेतला. ऑगस्टमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशातील ही पहिली विधानसभा निवडणूक होती. ज्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात 58.85 टक्के मतदान झाले आहे. बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. ते राजपोरा, जैनापोरा, शोपियान, डीएच पोरा, कुलगाम, त्राल, पुलवामा, देवसर, दुर्रू, कोकरनाग (एसटी), अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफ्वारा-बिजबेहारा, शांगस-अनंतनाग पूर्व, पहलगाम होते. हे सर्व दक्षिण काश्मीरमध्ये आहेत, ज्याला एकेकाळी दहशतवादाचा गड म्हणून ओळखले जायचे. जम्मू विभागातील पद्दार-नागसेनी, भदेरवाह, डोडा, इंदरवाल, किश्तवार, दोडा पश्चिम, रामबन आणि बनिहाल या जागांवरही काल मतदान झाले.
पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगानुसार पहिल्या टप्प्यात एकूण २३,२७,५८० मतदार होते. 3,276 मतदान केंद्रांवर एकूण 14,000 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले होते, अशास्थितीत सर्व ठिकाणी मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले.
2014 विधानसभा निवडणूक
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपीने या 24 जागांपैकी 11 जागा जिंकल्या होत्या, तर भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी चार जागा जिंकल्या होत्या. तर फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स आणि सीपीआय (एम) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली.
‘या’ दिवशी लागणार निकाल
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनसी आघाडीने लढत आहेत, तर पीडीपी, भारतीय जनता पार्टी (भाजप), पीपल्स कॉन्फरन्स आणि इतर काही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत.
दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होत असून, दुसऱ्या टप्प्यातील 25 सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील 1 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. यांचे निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येतील.