राज्यात गणेश विसर्जन (Ganpati Visarjan 2024) मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मुंबई (Mumbai), पुणे (Pune) या ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. भाविकांनी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीत डीजे देखील लावण्यात आले होते. अनेक गणेशभक्तांनी बेधुंद होऊन विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला आहे. परंतु आता गणपती विसर्जनादरम्यानची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कसबा गणपती मंडळाजवळ तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे.
पुण्यामध्ये एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्हीही व्यक्तींचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आले नाही. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती पुण्यातील ससून रुग्णालयाने दिलेली आहे. नयन ढोके (27), विशाल बल्लाळ (35) आणि 45 वर्षीय एक अनोळखी व्यक्ती अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कसबा गणपती मंडळाजवळ या तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघांच्या मृतदेहांचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले जात असून काही वेळामध्ये त्यांचा अहवाल समोर येणार आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानतंर या तिघांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबाबतची माहिती समोर येईल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गणपती विसर्जनादरम्यान परभणी जिल्ह्यातील एका 37 वर्षाच्या पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. याचसोबत राज्यात गणपती विसर्जन करताना २१ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.