Shivdeep Lande Resigned : प्रसिद्ध आयपीएस शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सध्या पूर्णियामध्ये आयजी म्हणून तैनात होते. 2006 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये राहून येथील लोकांची सेवा करत राहणार असल्याचे सांगत राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीनाम्याची (Shivdeep Lande Resigned) माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या भविष्यातील योजना देखील सांगितल्या.
बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवदीप लांडे यांनी दोन आठवड्यांपूर्वीच पूर्णिया आयजी म्हणून काम केले होते. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याबद्दल त्यांची नाराजी तीव्र होती आणि अवघ्या दोन आठवड्यांनंतर त्यांचा राजीनामा समोर आला आहे. एका महिन्यातील बिहारमधील आयपीएस अधिकाऱ्याने नोकरीचा राजीनामा देण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.
मी बिहार सोडणार नाही…
गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर गणवेशात तिरंग्याला वंदन करतानाचा फोटो शेअर करत आयपीएस शिवदीप लांडे यांनी लिहिले, “माझा प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी इथून पुढे देखील बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहारसाठी काम करत राहीन. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
कोण आहेत शिवदीप लांडे? एवढे लोकप्रिय का?
आयपीएस होण्यापूर्वी शिवदीप लांडे यांनी यूपीएससी क्रॅक केली आणि महसूल विभागात आयआरएस अधिकारी बनले. आयआरएस पदावर असताना त्यांनी २००६ मध्ये पुन्हा यूपीएससी उत्तीर्ण केली आणि यावेळी ते आयपीएस झाले. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर या नक्षलग्रस्त भागातून पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यांनी आपल्या पोलीस कारकिर्दीत अनेक जोखमीची कामे केली. त्यापैकी एक विशेष आणि लोकप्रिय म्हणजे खाण माफियांवर केलेली कारवाई. रोहतासचे एसपी असताना त्यांनी स्वत: जेबीसीसह खाण माफियांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत ३० हून अधिक गोळीबार करण्यात आला. शेवटी गुंडांचा पराभव झाला. या कारवाईत 500 जणांना अटक करण्यात आली.
आयपीएस शिवदीप लांडे हे बिहार केडरचे पोलिस अधिकारी आहेत. पण त्यांनी महाराष्ट्र पोलिसातही सेवा बजावली आहे. बिहारमध्ये एसटीएफचे एसपी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर त्यांना प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्र केडरमध्ये पाठवण्यात आले. बिहारला परत येईपर्यंत ते महाराष्ट्र एटीएसमध्ये डीआयजी पदापर्यंत पोहोचले होते.