आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या मुक्ताईनगरमधील कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या टिकेला प्रतिउत्तर देखील दिले होते. तसेच आता एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांनी देखील रुपाली चाकणकर यांना जोरदार टोला लगावलेला आहे.
रुपाली चाकणकर यांनी खडसे परिवारात सध्या कोण कोणत्या पक्षात आहे? हे माहीत नाही अशी टीका केली होती. तसेच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? असा प्रश्न करत रोहिणी खडसेंवर त्यांनी हल्लाबोल केला होता. याचसोबत आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघ ठेवला नाही आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत, असे वक्तव्य देखील रूपाली चाकणकर यांनी केले आहे.
यावरूनच आता एकनाथ खडसे यांनी रूपाली चाकणकरांना प्रतिउत्तर दिले आहे. आपणही पहिले राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे होता. आता राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे आहात. पहिले आपले पाहावे, दुसऱ्याच्या घरात डोकावू नका अशा शब्दांत त्यांनी रूपाली चाकणकरांना टोला लगावलेला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना अपुरी माहिती आहे त्यामुळे त्यांनी इतर ठिकाणी डोके घालू नये. 1999 साली अजित पवार यांनी आपल्या सासूबाईंना उमेदवार दिली होती. तेव्हापासून आम्ही अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ सोबत आहोत. अशा शब्दांत रूपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांना प्रतिउत्तर दिलेले आहे.