जम्मू काश्मीरमध्ये (Jammu kashmir) पहिल्यांदाच कलम 370 हटवल्यानंतर विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections 2024 ) होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर रोजी पार पडले आहे. या विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आज श्रीनगर (Srinagar) आणि कटरा (Katara ) येथे निवडणूक रॅलींना संबोधित करत होते. श्रीनगरमध्ये त्यांची प्रचार सभा पार पडली आहे. मोठ्या संख्येने लोक या प्रचार सभेला उपस्थित होते. श्रीनगरमधील सभा पार पडल्यानंतर त्यांनी कटरा या ठिकाणी निवडणूक रॅलींना संबोधित केले आहे.
यावेळी कटरा येथे प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, एनसी आणि पीडीपीवर जोरदार टीका केली आहे. याचसोबत जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही पाकिस्तानचा अजेंडा राबवू देणार नसून जगातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमधील कलम 370 परत आणू शकत नाही असे वक्तव्य पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केले आहे. तसेच लाल चौकात येऊन तिरंगा फडकवणे हे एकेकाळी जीवघेणे काम होते. वर्षानुवर्षे लोक लाल चौकात यायला घाबरत होते. पण आता चित्र बदलले आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये ईद आणि दिवाळी या दोन्ही सणांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो असे भाष्य देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केले आहे. दरम्यान, श्रीनगरमध्ये बोलताना पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर रोजी पार पडले असून या जागांवर सुमारे 61.3 टक्के मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला तर तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.