पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते वर्ध्याला भेट देणार आहेत. पी एम विश्वकर्मा योजनेचा(PM Vishwakarma Scheme) वर्षपूर्ती कार्यक्रम आज वर्ध्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती असणार आहे.
आज 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच कर्ज वितरित देखील करण्यात येणार आहे.
याचसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ कार्यक्रम देखील घेण्यात येणार आहे. तसेच अमरावतीमध्ये मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्कची केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे.
अमरावतीमध्ये या प्रकल्पासाठी सरकारने 10 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. हे पार्क 1000 एकरात उभारण्यात येत आहे. वस्त्र उद्योगासाठी हे पार्क उभारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहत या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे ई भूमिपूजन 12 वाजता करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये देखील येणार असून या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आज शहरात कोणत्याही भागात ड्रोन उडवता येणार नाही असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. यानंतर 26 सप्टेंबरला पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.