कोलकाता ( Kolkata )येथे 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. 9 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील आर जी कर(R G Kar Medical College and Hospital) रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ अनेक आंदोलने करण्यात आली. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले गेले. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी या घटनेच्या निषेधार्थ संप पुकारला होता. अखेर 41 दिवसांच्या कालावधीनंतर पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांकडून संप मागे घेण्यात आला आहे.
21 सप्टेंबरपासून सर्व डॉक्टर कामावर परत येणार आहेत अशी माहिती सांगण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डॉक्टरांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक चर्चा झाल्या आहेत. तसेच या बैठकीत सुरक्षेच्या मुद्द्यावरील डॉक्टरांच्या अनेक मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. यामुळेच आता संप मागे घेण्याचा निर्णय आंदोलक डॉक्टरांनी घेतलेला आहे.
आज दुपारी कोलकातामधील स्वास्थ्य भवन ते सीबीआय कार्यालयापर्यंत ज्युनिअर डॉक्टरांकडून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे आणि उद्या ते कामावर परतणार आहेत. यादरम्यान आपात्कालीन सेवा सुरु राहतील तर ओपीडी सेवा बंद राहणार आहे. दरम्यान, आमचा लढा अद्याप संपलेला नाही असे देखील ज्युनिअर डॉक्टरांनी सांगितलेले आहे.