Nandurbar : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तणावाच्या घटना घडत आहेत, दरम्यान, पुन्हा एकदा अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी घडली. नंदुरबार मध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. हा तणाव एवढा वाढला की, दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली, आणि जाळपोळही मोठ्या प्रमाणात झाला, या घटनेत अनेकजण लोकं गंभीर जखमी देखील झाले आहेत.
या ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की पोलिसांना लोकांना पांगवण्यासाठी अक्षरशः अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीही घटनास्थळी हजर होते. अनंत चतुर्थी संपल्यानंतर ईदची मिरवणूक निघाली होती. त्यावेळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजता नंदुरबारमधील माळीवाडा परिसरातून ईदची मिरवणूक जात असताना दोन गटात हा तणाव निर्माण झाला. यानंतर शहरातील इतर काही भागातही हा तणाव पसरला. माळीवाडा हा हिंदूबहुल परिसर असून पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या लोकांकडून प्रथम दगडफेकीला सुरुवात झाली. या दगडफेकीत काही लोक जखमीही झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, आधी दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली आणि नंतर त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले. दगडफेकीनंतर गाड्यांचीही तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर गर्दी काहीशी कमी झाली. ही दगडफेक का झाली यामागील कारण अद्यापही स्पष्ट नाही. दगडफेक आणि वाहनांना आग लावणारे कोण होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
अनंत चतुर्थी संपल्यानंतर काल ईदची मिरवणूक निघाली. दगडफेकीनंतर मिरवणुक पुढे गेली, मात्र शहरातील इतर काही भागात दगडफेकीच्या घटना सुरू झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास सर्वच ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात आली असून, काही आरोपींची ओळख देखील पटली आहे आता त्यांना ताब्यात घेण्याचे काम पोलिस करत आहेत.