आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi )महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वर्धा याठिकाणी भेट दिली आहे. यावेळी पी एम विश्वकर्मा योजनेचा(PM Vishwakarma Scheme) वर्षपूर्ती कार्यक्रम आज वर्ध्यामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन(C. P. Radhakrishnan),हे देखील उपस्थिती होते. वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच कर्ज वितरित देखील करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. एका वर्षात १८ वेगवेगळ्या व्यवसायातील २० लाखाहून अधिक लोकांना विश्वकर्मा योजनेत जोडले गेले आहे. ८ लाख कारागिरांना ट्रेनिंग दिले असून त्यातील ६० हजाराहून अधिक लोक महाराष्ट्रातील आहेत. विश्वकर्मा योजना ही केवळ सरकारी योजना नाही तर ही योजना भारताच्या हजारो वर्ष जुन्या कौशल्याचा विकसित भारतासाठीचा रोडमॅप आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
तसेच जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एससी, एसटी आणि ओबीसी लोकांना पुढे जाऊ दिले नाही.परंतु आमच्या सरकारने कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली आहे.यामुळेच गेल्या वर्षभरातील आकडेवारीवरून एससी, एसटी आणि ओबीसी समाज विश्वकर्मा योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य तो हमीभाव न देऊन शेतकऱ्यांना संकटात टाकले तसेच शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले आहे. यानंतर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कचे काम सुरू झाले असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच लखपती दीदी, लाडकी बहीण योजना सुरू करू शकलो आणि यामुळे महिलांना आर्थिक लाभ झाला आहे. तसेच आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खूप आभार! त्यांच्या आशीर्वादाने देशाला सात टेक्सटाईल पार्क मिळाले असून त्यातील एक पार्क अमरावतीला मिळाला आहे. यामुळेच आता अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातील दोन लाख नागरिकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ आज मिळणार असून साडे सहा लाख लोकांचे जीवन यामुळे बदलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
तसेच या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते यावरूनच आता वर्ध्याच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल केला आहे. . “काही लोक विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिले आहे, तो कुणी रद्द करू शकत नाही” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे परिसराचा मेकओव्हर होणार आहे तसेच दोन लाख लोकांना रोजगार मिळणार असून यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.