ओडिशा (Odisha) संगीत क्षेत्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आलेली आहे. सुप्रसिद्ध संबलपुरी गायिका रुक्साना बानो (Ruksana Bano ) हीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर तिने 18 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. शूटिंगदरम्यान सेटवर ज्यूस प्यायल्यानंतर ती आजारी पडली होती. यानंतर भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू होते.गायिका रुक्साना बानो ही अवघ्या 27 वर्षांची होती.
रुक्साना बानो ही स्क्रब टायफस या रोगाने ग्रस्त असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. तसेच न्यूमोनिया (Peumonia), लिव्हर इन्फेक्शन आणि हृदयविकाराचा त्रास रुक्साना बानो हिला होता पण आता तिचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
परंतु आता रुक्साना बानोच्या मृत्यूच्या घटनेनंतर तिच्या कुटुंबाने धक्कादायक दावा केलेला आहे. पश्चिम ओडिशातील एका प्रतिस्पर्धी गायकाने रुक्सानाला विष दिले असा आरोप गायिका रुक्साना बानो हिची आई आणि बहिण यांनी केला आहे. प्रतिस्पर्धी गायकाकडून रुक्सानाला यापूर्वीही धमक्या देण्यात आल्या होत्या असे बहीण रुबी बानो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे.
दरम्यान, रुक्सानाच्या आईने आपल्या मुलीला न्याय देण्याची विनंती करणारा एक व्हिडिओही जारी केला होता, सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.