आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात चुरशीची लढत रंगण्याची शक्यता आहे. अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Bhanudas Kardile) निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे या मतदारसंघात निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांचा पराभव झाला होता, तेव्हा राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी त्यांना हरवले होते. या पराभवाचा बदला काढण्याच्या उद्देशाने कर्डिले यांनी यंदा पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. “राहुरीच्या जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे,” असे कर्डिले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील यांची राहुरीतून उमेदवारी चर्चेत होती, त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असे म्हटले जात होते परंतु आता शिवाजी कर्डिले यांनी स्वत: आपण राहुरीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुजय विखे यांनी आता कोणत्या मतदारसंघातून लढायचे याबद्दल चर्चा सुरू आहे. कर्डिले यांचा हा निर्णय भाजपमध्ये वाद निर्माण करू शकतो, कारण त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीतील एकीला धक्का लागू शकतो असे म्हटले जात आहे. तसेच कर्डिले आणि तनपुरे यांच्यातील लढत म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तेसाठीची एक महत्त्वाची टक्कर असणार आहे.
यामुळेच आता आगामी विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असून यामध्ये कोणाचा विजय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.