राष्ट्रपती द्रौपती मुर्मू (Droupadi Murmu ) यांनी आम आदमी पार्टीच्या (AAP) नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांची अधिकृतपणे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती केली आहे. तसेच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आज संध्याकाळी साडे चारच्या सुमारास आतिशी मार्लेना मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आतिशी इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज निवास येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे वृत्त समोर आले आहे.
आम आदमी पार्टीच्या आमदारांच्या बैठकीत आतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत आतिशी मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींनी देखील मंजूरी दिली आहे.आतिशी यांच्यासह आज पाच मंत्री शपथ घेणार आहेत. सौरभ भारद्वाज, गोपाल राय आणि कैलाश गहलोत, इमरान हुसैन, मुकेश अहलावत हे पाच जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे मला दुःख आहे. परंतु त्यांनी मला इतकी मोठी जबाबदारी दिली तसेच त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी आनंदी आहे . आगामी विधानसभा निवडणुकीनंतर केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणण्यासाठी मी कठोर परिश्रम करणार आहे असे आतिशी मार्लेना प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.
आतिशी सध्या दिल्ली विधानसभेत कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मार्च 2023 मध्ये त्या दिल्ली मंत्रिमंडळात सामील झाल्या आहेत. तसेच आतिशी यांनी माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार असताना दिल्लीच्या सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तसेच त्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून त्या AAP चे नेतृत्व करणार आहेत .
दरम्यान, आता 43 वर्षांच्या आतिशी मार्लेना सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत.