बदलापूर (Badlapur) येथील विद्यालयात अवघ्या तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ऑगस्टमध्ये घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केला होता. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे(Akshay Shinde) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी टीमची नेमणूक केली होती. एसआयटीच्या प्रमुख आय. पी. एस आरती सिंग ( Aarti Singh )यांनी आता हे प्रकरण फास्ट ट्रक घ्यावे अशी मागणी न्यायाधीशांकडे केलेली आहे.
कल्याणच्या विशेष पॉक्सो न्यायालयात एसआयटीने ५०० पानांचे चार्जशीट आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याची कसून चौकशी केली आहे. डॉक्टर,शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी यांच्यासोबत २० जणांची साक्ष या प्रकरणात नोंदवण्यात आली आहे. यावेळी आरोपींच्या कबुलीजबाबात दोन आरोपपत्रे तयार करण्यात आली असून याला आरोपीचे शाळेत येताना आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेजही जोडण्यात आले आहे. आता पोलिसांनी विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे
यावेळी चौकशीत आरोपी अक्षय शिंदे याने डॉक्टरांसमोर आपण गुन्ह्यात सहभागी होतो, असा कबुलीजबाब दिला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले आहे.वैद्यकीय चाचणीचे अहवाल आणि २० जणांची घेण्यात आलेली साक्ष हे अक्षय शिंदेवरील आरोप सिद्ध करण्यास मदत करेल असे सांगण्यात येत आहे.