धारावीमधून (Dharavi) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे लोक आज सकाळी धारावीमधील एका मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी गेले होते. यावेळी विरोध करत महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड तेथील लोकांनी केली आहे. धारावीतील ९० फूट रोडवरील २५ वर्ष जुनी सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले असून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी लोकांना शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत परंतु लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. यामुळेच वरिष्ठ पोलीस देखील याठिकाणी हजर झाले आहेत.
आज सकाळी बीएमसीचे पथक धारावीमधील एका मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी धारावीत गेले होते काही नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या गाड्यांवर दगडफेक देखील केली. यामध्ये बीएमसी पथकांच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या घटनेमुळे धारावीत आता तणाव वाढतच चालला आहे. काल रात्रीपासून येथील लोकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, अल्पसंख्याकांनी जमाव आणि हल्ला करण्याबाबत आधीच योजना आखली होती असे समजले आहे. याबाबतचे एक पत्र समोर आले आहे. हे पत्र सर्व स्थानिक लोकांपर्यंत आधीच पोहचविण्यात आले होते. या पत्रात सुभानिया मशिदीकडून जास्तीत जास्त स्थानिक लोकांनी जमावे असे आवाहन करण्यात आले होते. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी येणार हे समजताच लोकांकडून जमाव करण्याच्या हालचाली त्या ठिकाणी सुरु झाल्या होत्या. सकाळी ९ च्या आधी सर्व स्थानिक लोकांनी जमावे असे या पत्राच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.
यामुळेच आता धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणी पोलीस आंदोलकांशी संवाद साधत असून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.