भारत सरकारकडून एअर मार्शल अमर प्रीत सिंग(Amar Preet Singh) यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या अमर प्रीत सिंग हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार सांभाळत असून ३० सप्टेंबरपासून ते हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी आधीचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhari) हे निवृत्त होणार आहेत.
27 ऑक्टोबर 1964 रोजी अमर प्रीत सिंग यांचा जन्म झाला आहे. 1984 मध्ये त्यांनी आपल्या हवाई दलाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून भारतीय हवाई दलात 21 डिसेंबर 1984 रोजी त्यांची नियुक्ती झाली होती. वरिष्ठ हवाई अधिकारी म्हणून इस्टर्न एअर कमांडमध्ये त्यांनी काम केले आहे तसेच त्यांनी सेंट्रल एअर कमांडचेही नेतृत्व केलेले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध कमांड, कर्मचाऱ्यांसोबत, तसेच परदेशी नियुक्तींमध्ये काम केले आहे.
एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे फायटर पायलट आहेत तसेच त्यांनी तब्बल पाच हजार तासांपेक्षा अधिक विमान उड्डाण केले आहेत. ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे देखील नेतृत्व एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांनी केले आहे. याचसोबत त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात जबाबदारी सांभाळली आहे.
दरम्यान, अमरप्रीत सिंग यांनी वयाच्या 59 व्या वर्षी तेजस विमान चालवले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना २०१९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ‘अति विशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच 2023 मध्ये ‘परम विशिष्ट सेवा पदक’ देखील एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांना प्रदान करण्यात आले आहे.