अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान आतिशी मार्लेना यांना मिळाला आहे. आज राज निवास येथे आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यांच्यासोबत इतर पाच जणांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन यांचा समावेश आहे.
यावेळी सर्वप्रथम मी दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री,आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माझे गुरू अरविंद केजरीवाल यांचे आभार मानू इच्छिते कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला इतकी मोठी जबाबदारी दिली आहे असे आतिशी मार्लेना म्हणाल्या आहेत. तसेच दिल्लीच्या जनतेने आम्हाला काम करण्यासाठी निवडून दिले असून जनतेसाठी काम करणे हेच उद्दिष्ट आमचे आहे उरलेल्या महिन्यांत प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येतील असे भाष्य आप नेते गोपाल राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी केले आहे.
तसेच यावेळी बोलताना कैलाश गेहलोत म्हणाले आहेत की , पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शन कायम राहील. पूर्वीप्रमाणेच दिल्लीतील लोकांसाठी काम करत राहणे आणि अरविंद केजरीवाल यांना परत आणणे हे आमचे एकमेव ध्येय आहे.
आतिशी मार्लेना आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून त्या AAP चे नेतृत्व करणार आहे . दरम्यान, 43 वर्षांच्या आतिशी मार्लेना सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.