Jammu Kashmir Assembly Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना देशाचे पंतप्रधान मोदींबाबत तसेच पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या रॅलीत बोलताना शाह यांनी, पाकिस्तान मोदींना घाबरतो आणि त्यांच्यात हिंमत नाही असे वक्तव्य केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये बोलताना ते म्हणाले, ‘येथे सीमेवर शांतता आहे कारण पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतो आणि ते गोळीबार करण्याचे देखील धाडस करणार नाही. कारण त्यांना माहित आहे की भारत त्यांना “योग्य ते प्रत्युत्तर” देईल.
केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भागात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुर्तझा खान यांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, “केंद्राने बंदुका आणि दगडांऐवजी तरुणांच्या हातात लॅपटॉप देऊन दहशतवाद संपवला आहे. सरकार बंदुकीचा आवाज जम्मू प्रदेशातील पर्वतांवर कधीच पडू देणार नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी सीमेवर आणखी बंकर बांधू. मला तुम्हाला 1990 च्या दशकातील सीमेपलीकडून गोळीबाराची आठवण करून द्यायची आहे. मात्र, आज परिस्थिती वेगळी आहे. आधी गोळीबार व्हायचे कारण इथले राज्यकर्ते पाकिस्तानला घाबरत होते, पण आता पाकिस्तान मोदींना घाबरतो. ते आता गोळीबार करण्याचे धाडस करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे तसे केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल.’
40 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला
अमित शाह म्हणाले की, “दहशतवाद 1990 मध्ये सुरू झाला आणि 2014 पर्यंत सुरू राहिला, ज्यामध्ये 40 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला, पुढे नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांच्यावर निशाणा साधत या पक्षांकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले गेले असा दावाही शहांनी यावेळी केला. तसेच मोदींचे कौतुक करत शाह म्हणाले, ‘भाजप आणि मोदींनी दहशतवाद संपवला आणि बंदुका आणि दगडांऐवजी तरुणांच्या हातात लॅपटॉप दिला.’
“दहशतवादाचा फायदा कोणालाच होत नाही. आमच्या मुलांना बंदुका देण्यात आल्या. पण आम्ही पहाडी तरुणांना पोलीस आणि सैन्यात भरती करून बंदुका देऊ. यासाठी आम्ही सीमेवर एक विशेष भरती मोहीम देखील राबवणार आहोत.
पुढे त्यांनी या निवडणुकीमुळे केंद्रशासित प्रदेशातील नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या तीन कुटुंबांची सत्ता संपुष्टात येईल. असाही दावा केला. यावेळी शहांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, तसेच त्यांच्यावर भाष्य देखील केले.
कमल 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका
तुमच्या माहितीसाठी, कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला होणार आहे. यानंतर 1 ऑक्टोबरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.