Train Accident : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पुन्हा एकदा ट्रेन उडवण्याचा कट उघडकीस आला आहे. कानपूर देहाट जिल्ह्यात रेल्वे रुळावर एक छोटासा गॅस सिलिंडर सापडला असून, मोठी दुर्घटना टळली आहे. नुकतेच कानपूरमध्ये कालिंदी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट रचला गेला. एलपीजी सिलिंडर रेल्वे रुळावर ठेवण्यात आला. याशिवाय रेल्वे लाईनजवळ पेट्रोल आणि बारूद देखील जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागातील पेरांबूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर एलपीजीचा एक छोटा सिलेंडर आढळून आला. मालगाडी येथून पुढे जाणार असतानाच लोको पायलटने सिलेंडर पाहून मालगाडी लेगच थांबवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रेल्वे रुळावर ज्या ठिकाणी गॅस सिलिंडर सापडला ते ठिकाण कानपूर देहाट जिल्ह्यात आहे.
या घटनेबाबत रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे एसपी म्हणाले की, ‘पाच किलो क्षमतेचा एलजीपीचा रिकामा सिलिंडर रेल्वे ट्रॅकवर ठेवण्यात आला आहे. ट्रेनचा वेग खूपच कमी होता. जेव्हा लोको पायलटने सिलिंडर पाहिला तेव्हा त्याने आपत्कालीन ब्रेक लावले आणि नंतर अधिकाऱ्यांना माहिती दिली. याप्रकरणी आरपीएफने तपास सुरू केला आहे. याशिवाय स्थानिक पोलिसांनाही ही माहिती देण्यात आली आहे.
कानपूरमध्येच कालिंदी एक्स्प्रेसला उडवण्याचा कट
गेल्या 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये स्फोट घडवण्याचा कट कानपूरमध्ये उघड झाला होता. प्रयागराजहून भिवानीकडे जाणारी कालिंदी एक्स्प्रेस रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या एलपीजी गॅसने भरलेल्या सिलेंडरला धडकली होती. त्यानंतर मोठा आवाजही झाला. एवढेच नाही तर घटनास्थळी पेट्रोलने भरलेली बाटली आणि माचिसच्या काड्या आणि बारूदही सापडले. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. याशिवाय यूपी एटीएस, पोलीस आणि जीआरपीही तपास करत आहेत.
अजमेरमध्येही रेल्वे ट्रॅकवर सिमेंट ब्लॉक
या घटनेनंतर लगेचच 10 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील अजमेरमध्ये मालगाडी उलटण्याचा कट उघडकीस आला. अजमेरच्या सरधना येथे रेल्वे ट्रॅकवर सुमारे 70 किलो वजनाचे सिमेंटचे दोन ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने सिमेंट ब्लॉक तोडून गाडी पुढे गेली आणि मोठी दुर्घटना टळली. याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कानपूर आणि अजमेरनंतर मालगाडी उलटण्यासाठी महाराष्ट्रातील सोलापूरमध्येही सिमेंटचे दगड ठेवण्यात आले. सोलापूरच्या कुर्डुवाडी स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर मोठा सिमेंटचा दगड सापडला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यापूर्वी 17 ऑगस्टच्या रात्री कानपूर-झाशी मार्गावरील साबरमती एक्स्प्रेसचे (19168) इंजिनसह 22 डबे रुळावरून घसरले होते. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती.