Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (२२ सप्टेंबर) पहिल्यांदाच दिल्लीतील जंतरमंतर येथे जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘तुमच्यामध्ये राहून बरे वाटते, जंतरमंतरवरील जुने दिवस आठवले.’
जनता अदालतला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी 2011 च्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाचे दिवस आठवले. केजरीवाल म्हणाले, ‘4 एप्रिल 2011 रोजी स्वतंत्र भारताची सर्वात मोठी भ्रष्टाचारविरोधी चळवळ जंतरमंतरवरच सुरू झाली होती, जी दीड ते दोन वर्षे सुरू होती. तत्कालीन सरकारही खूप उद्दाम होते, आमचे ऐकत नव्हते, निवडणूक लढवून दाखवून दाखवा असे आव्हान द्यायचे. आम्ही निवडणूकही लढवली आणि दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केले.
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, निवडणुका प्रामाणिकपणे लढवता येतात आणि सरकारही बनवता येते, हे आम्ही दाखवून दिले आहे. आपल्या सरकारच्या यशाची गणना करताना केजरीवाल म्हणाले, सरकार स्थापन करून आम्ही लोकांना अशा सुविधा दिल्या ज्या कुणीच दिल्या नाहीत, मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा.’ यावेळी केजरीवालांनी राजीनामा देण्यामागचे कारणही सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी 13 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, त्यानंतर केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी आपला राजीनामा उपराज्यपालाकडे सुपूर्द केला होता. आपल्या राजीनाम्याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, ‘तुम्ही विचार करत असाल की आम्ही राजीनामा का दिला? मी भ्रष्टाचार करण्यासाठी आलो नाही तर देशाचे राजकारण बदलण्यासाठी आलो आहे. मला खुर्ची आवडत नाही, मला आतून खूप वाईट वाटले. म्हणून मी राजीनामा दिला, आयुष्यात प्रामाणिकपणे काम केले. या 10 वर्षात मी फक्त तुमचे प्रेम मिळवले आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांना मुख्यमंत्री निवास रिकामा करावा लागेल, असे सांगून ते म्हणाले, आज माझ्याकडे राहण्यासाठी घरही नाही.
पुढे केजरीवाल म्हणाले, लोकं मला म्हणाले माझे घर घ्या, नवरात्रीच्या काळात मी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडेन आणि तुमच्या घरी येऊन राहीन. जोपर्यंत माझी निर्दोष म्हणून सुटका होत नाही. तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. कोर्टात वर्षानुवर्षे खटला चालणार आहे, म्हणूनच मी जनतेच्या कोर्टात आलो आहे.
‘मी बेईमान असतो तर हजारो कोटी खाऊन लोकांना फुकटात वस्तू दिल्या असत्या का? आज मी तुम्हाला विचारायला आलो आहे की केजरीवाल चोर आहेत का?’ असे अनेक प्रश्न केजरीवाल यांनी जनतेच्या कोर्टात मांडले.