Modi Meets Biden : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत ‘अत्यंत अर्थपूर्ण’ बैठक घेतली ज्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती बायडेन यांनी शनिवारी त्यांचे ग्रीनविले, डेलावेअर येथील निवासस्थानी मोदींचे स्वागत केले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. दोन्ही नेत्यांची बायडेन यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली.
मोदी आणि बिडेन यांच्यात एक तासाहून अधिक काळ संभाषण झाले, त्यानंतर बायडेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर करत लिहिले, ‘अमेरिकेची भारतासोबतची भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, जवळची आणि अधिक गतिमान आहे. पंतप्रधान मोदी, आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधण्याच्या आमच्या क्षमतेने मी प्रभावित होतो आणि आजही तेच झाले.’
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “दोन्ही नेत्यांनी यावेळी परस्पर हिताच्या तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘परस्पर हिताच्या क्षेत्रात भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्र तसेच जागतिक समस्यांवर चर्चा केली.’
बैठकीनंतरच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत-अमेरिका भागीदारी ‘जागतिक भल्यासाठी महत्त्वाकांक्षी अजेंडाचा पाठपुरावा करत आहे’ आणि याला ’21 व्या शतकातील परिभाषित भागीदारी’ म्हटले आहे.
The United States' partnership with India is stronger, closer, and more dynamic than any time in history.
Prime Minister Modi, each time we sit down, I'm struck by our ability to find new areas of cooperation. Today was no different. pic.twitter.com/TdcIpF23mV
— President Biden (@POTUS) September 21, 2024
दरम्यान, यावेळी बायडेन यांनी मोदींच्या पोलंड आणि युक्रेनच्या ऐतिहासिक भेटी आणि युक्रेनसाठी शांतता आणि मानवतावादी समर्थनाचा संदेश दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. भारतीय पंतप्रधानांची युक्रेन आणि पोलंडला गेल्या काही दशकांतील ही पहिलीच भेट होती.
काय म्हणाले पीएम मोदी?
बैठकीनंतर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनपासून अनेक जागतिक सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी नुकतीच युक्रेनला भेट दिल्याचे तुम्ही पाहिले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीवरही त्यांनी चर्चा केली. जून 2023 मध्ये अमेरिकेला दिलेल्या अधिकृत भेटीची आणि सप्टेंबर 2023 मध्ये G-20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या भारत भेटीची आठवण करून मोदी म्हणाले की, ‘या भेटींनी भारत-अमेरिका भागीदारीला अधिक गतिमानता आणि सखोलता दिली आहे.’
मोदींनी आपल्या ‘X’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ग्रीनविले, डेलावेअर येथील निवासस्थानी मला आमंत्रण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आमचा संवाद खूप अर्थपूर्ण होता. बैठकीदरम्यान आम्हाला प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.’
मोदींसोबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा हेही तिथे होते. अमेरिकेत मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशीही स्वतंत्र बैठका घेतल्या.