Anura Dissanayake : मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. 56 वर्षीय दिशानायके आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अनुरा कुमारा दिसानायके यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच भारत-श्रीलंका दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे देखील म्हंटले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे ब्रॉड फ्रंट नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) चे नेते दिसानायके यांनी समगी जना बालवेगया (SJB) त्यांचे प्रतिस्पर्धी सजिथ प्रेमदासा यांचा पराभव केला आहे.
दिसानायके यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ‘X’ वर पोस्ट शेअर करत लिहिले, “श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अनुरा कुमारा दिसानायके यांचे अभिनंदन. “भारताच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि व्हिजन सागरमध्ये श्रीलंकेचे विशेष स्थान आहे.” पंतप्रधान पुढे म्हणाले, “आमच्या लोकांच्या आणि संपूर्ण प्रदेशाच्या फायद्यासाठी आमचे बहुआयामी सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
Congratulations @anuradisanayake, on your victory in the Sri Lankan Presidential elections. Sri Lanka holds a special place in India's Neighbourhood First Policy and Vision SAGAR. I look forward to working closely with you to further strengthen our multifaceted cooperation for…
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2024
कोण आहेत दिसानायके?
दिसानायके यांचा जन्म थम्बुथेगामा, श्रीलंकेत झाला. त्यांची आई गृहिणी आणि वडील मजूर होते. मात्र दिसानायके यांनी कठीण परिस्थितीत विद्यापीठाचे शिक्षण घेतले. त्यांनी शालेय जीवनात मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पार्टी (JVP) मध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये, ते श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती चंद्रिका कुमार तुंगा यांच्या सरकारमध्ये प्रथमच कॅबिनेट मंत्री झाले. पण एका वर्षानंतर त्यांनी सरकार आणि एलटीटीई यांच्यातील कराराच्या निषेधार्थ राजीनामा दिला. 2014 मध्ये JVP चे नेते झाल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली. मात्र त्यानंतर त्यांना केवळ 3 टक्के मते मिळाली. यावेळी 2024 मध्ये 53 टक्क्यांहून अधिक मते मिळवून ते अध्यक्षपदावर पोहोचले.