Imtiaz Jaleel Tiranga Rally : एआयएमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) आणि भाजप आमदार नितीश राणे (Nitesh Rane) यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्याविरोधात मोर्चा काढला आहे. इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथून ‘चलो मुंबई तिरंगा रॅली’ काढली. या रॅलीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच रॅली मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्याना भेट देणार असल्याचे म्हंटले आहे.
रॅलीदरम्यान इम्तियाज जलील म्हणाले की, “महाराष्ट्रात जाती-धर्माच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंचावरून मुस्लिमांना धमकावले जात आहे, ही गुन्हेगारी कृत्ये नाहीत का? त्यामुळेच आम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला…हा देश राज्यघटनेनुसार, कायद्यानुसार चालेल, याची आठवण आम्ही मुख्यमंत्र्यांना करून देणार आहोत. 60 एफआयआर असूनही पोलिस कारवाई करण्यास का तयार नाहीत, कारण मुख्यमंत्र्यांना कारवाई करायची नाही, धर्म किंवा एखाद्या धर्मातील महान व्यक्तींवर अशी विधाने केली जात असतील तर त्यावर कडक कायदा व्हायला हवा. असं ते म्हणाले आहेत.
यावेळी ते असही म्हणाले, ‘आजची ही तिरंगा रॅली आमची एमआयएम म्हणून निघालेली नाही तर आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी मिळून काढलेली आहे. आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात निघालेलो नाही तर हे कायद्याचं राज्य आहे. रामगिरी आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनंतर त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. दरम्यान, अहमदनगर येथे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप आमदार नितेश राणे देखील सहभागी झाले होते. यावेळी राणेंनी मंचावरून “जर आमच्या रामगिरी महाराजांच्या विरूद्ध काही कुणी बोललं तर मशिदी मध्ये येऊन एकेकाला मारेन’. असे वक्तव्य केले होते, यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. याच वक्तव्यांविरोधात आज इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली काढली.