Israel Massive attack on Lebanon : गाझामध्ये हमासचे कंबरडे मोडणाऱ्या इस्रायली लष्कराने आता लेबनॉनवर (Lebanon) हल्ला करण्याची तयारी केली आहे. हिजबुल्ला आणि इस्रायल (Israel) यांच्यात काही दिवसांपासून हवाई हल्ले सुरू आहेत. सोमवारी, इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील लोकांना शक्य तितक्या लवकर हिजबुल्लाच्या (Israel Vs Hezbollah War) जागांपासून दूर जाण्याचा इशारा दिला आहे. कारण इस्रायल लवकरच लेबनॉनमध्ये तीव्र हल्ले सुरू करणार आहे.
यापूर्वी गाझामध्येही इस्रायली लष्कराने लोकांना हमासच्या ठिकाणांपासून दूर जाण्याचा इशारा दिला होता. यानंतर इस्रायलने गाझावर केलेले हल्ले संपूर्ण जगाने पहिले. गाझा हल्ल्यात किमान 44 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.
इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी व्हिडिओ जारी करत म्हंटले, “आम्ही लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहकडून लष्करी उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती आणि क्षेत्रांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहोत. आम्हाला माहिती मिळाली आहे की, हिजबुल्लाहने तेथे शस्त्रे साठवून ठेवली आहेत.” तरी तेथील नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणे निघून जावे.
हगारी म्हणाले की, लष्कराने सोमवारी सकाळी हिजबुल्लाच्या ठिकाणांवर नवीन हल्ले सुरू केले आहेत. नजीकच्या भविष्यातही हल्ले सुरूच राहतील, असे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे.
इस्रायली सैन्याने सोमवारी लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्लाच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे. आपले युद्ध उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, इस्रायली सैन्य हवाई हल्ल्यांनंतर जमिनीवर आक्रमण देखील करेल. मात्र, लष्कराने या हल्ल्यांबाबत अधिक माहिती दिलेली नाही.
लेबनॉनची अवस्था गाझासारखी…
इस्त्रायली लष्कराने आता पूर्ण ताकदीने लेबनॉनवर हल्ला करण्याची योजना आखली आहे. यापूर्वी, गाझामधील हल्ल्यांपूर्वी इस्रायलने लोकांना हमासच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. गाझानंतर आता लेबनॉनला लक्ष करण्याची पूर्ण तयारी इस्त्रायलकडून करण्यात आली आहे, तसेच येथील नागरिकांना इशाराही देण्यात आला आहे.
एका आठवड्यापूर्वी, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सैनिकांची एक बैठक बोलवली होती, या बैठकीत हमासनंतर, उत्तर सीमेवर इस्रायलींना माघार घेणे आणि हिजबुल्लाचा संपूर्ण नाश करणे यावर चर्चा झाली होती. हिजबुल्लाहच्या सततच्या हल्ले आणि दहशतीमुळे उत्तरेकडील भागात राहणाऱ्या लोकांना पलायन करावे लागत आहे, यावर नेतन्याहू यांनी भर दिला होता. त्यामुळे आता हिजबुल्लाविरुद्ध संपूर्ण युद्धाची वेळ आली आहे. असे त्यांनी म्हंटले होते.
नेतान्याहू यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी लेबनॉनमध्ये पेजर आणि नंतर वॉकीटॉकी हल्ले झाले. परिणामी हल्ल्यात हजारो लोक जखमी झाले आणि 40 हून अधिक लोक मरण पावले. यानंतरही हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये हवाई हल्ले सुरूच आहेत. आता इस्रायलने सोमवारपासून लेबनॉनवर हल्ले करण्याची घोषणा केली आहे. हे हल्ले सुरुवातीला हवाई असू शकतात. यानंतर इस्रायली सैन्य गाझामध्ये जमिनीवर आक्रमण करू शकते.
अमेरिका आणि अनेक देशांकडून लेबनॉनमधील नागरिकांना आवाहन
याआधी रविवारी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडाच्या सरकारने लेबनॉनमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले होते की, जर विमान सुविधा आता उपलब्ध असेल तर वेळेचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर लेबनॉन सोडा. अन्यथा आमचे दूतावासही तुम्हाला नंतर मदत करू शकणार नाहीत. फ्रान्स, कॅनडा आणि ब्रिटनसह अनेक देशांनी असाच इशारा दिला होता. हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील तणाव सतत वाढत असून, त्याचे कधीही युद्धात रूपांतर होऊ शकते, अशी भीती सर्वांना आहे.