विधानसभा निवडणूक (Vidhansabha Elections 2024) तोंडावर आली असून सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागतील असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आता महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावर बैठका सुरू झाल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून अनेक नेते पक्षांतर देखील करत आहेत. सर्वच पक्षांकडून राजकीय डावपेच सुरू आहेत. अस असतानाच आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर या दोघांमध्ये 30 मिनिटे बैठक झाली आहे. यामुळेच आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जागा वाटपावरून आणि राज्यातील विकास कामांबाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज सकाळी मनसे नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 9 वाजता बैठक होणार होती परंतु या बैठकीपूर्वीच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
सध्या विधानसभेत किती जागा मनसे उत्तम प्रकारे लढू शकतो ? याची चाचणी केली जात आहे. विधानसभेसाठी मनसे आणि महायुती एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते? याचसोबत दादर माहीम हा शिवसेनेचा पारंपारिक गड असून ही जागा मनसेसाठी सोडावी या विषयांवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची संभाव्य शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनसे नेत्यांची शिवतीर्थवर बैठक होणार असून या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे.