पुणे (Pune ) शहरात रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे झालेले अपघात अनेकदा पाहिले आहेत. दरम्यान, पुण्यातून अशी एक अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यामुळे सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. पुण्यातील बुधवार पेठेतील समाधान चौक परीसरात 20 सप्टेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे.
पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचल्याने महानगरपालिकेचा ट्रक पूर्णपणे चक्क खड्यात गेल्याचा प्रकार घडला आहे. पेव्हिंग ब्लॉकने रस्ता माखला असल्याने रस्ता खचू लागला आणि ट्रक खड्ड्यात जाऊ लागला. ही गोष्ट ट्रक चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच गाडीतून बाहेर उडी मारली. आणि स्वतःचे प्राण वाचवले. या ट्रकसोबत दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात गेल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे पुणेकरांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर लगेच त्या ठिकाणी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या सिंकहोलचे मोजमाप केल्यानंतर समजले की ते 25 फुट खोल होते. पक्क्या फरश्या असलेल्या सामान्य पार्किंगच्या जागेत जमीनीवर एवढा मोठा खड्डा कसा पडू शकतो हा प्रश्न आता निर्माण झाला आहे ?
ही घटना घडल्यानंतर पुण्यातील इतिहास प्रेमी आणि हेरिटेज तज्ज्ञ संदीप गोडबोले यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी एक जुना नकाशा शेअर केला आहे. समाधान चौकाजवळील हा नकाशा असून या नकाशावर 1800 च्या दशकात एक गोलाकार विहीर दिसून येत आहे. “हे सिंकहोल त्या जुन्या विहिरीमुळेच निर्माण झाले असावे.” असे संदीप गोडबोले म्हणाले आहेत.
यानंतर त्यांनी 1960 चा नकाशा देखील शेअर केला आहे. 1960 च्या नकाशात लक्ष्मी रोड आणि सिटी पोस्ट ऑफिस असले तरी विहिरीचे कोणतेही चिन्ह दाखवले नाही यामुळेच 1800 ते 1960 च्या दरम्यान ही विहीर बंद करण्यात आली असावी, परंतु ती नीट बंद न झाल्यामुळे सिंकहोलचा त्रास उद्भवला असावा असे देखील संदीप गोडबोले म्हणाले आहेत.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी देखील संदीप गोडबोले यांच्या बोलण्याला पाठींबा दिला आहे. पुण्यात कोणतेही काम करताना ऐतिहासिक वास्तूंचा विचार करावा तसेच नवीन बांधकाम करताना २०० वर्षांचा इतिहास तपासावा तसेच जुन्या नकाशांचा अभ्यास करून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता महापालिकेकडून करण्यात येत आहे.