आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections 2024) तोंडावर आल्या असून सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सोलापुरात आयोजित जनसन्मान यात्रेत बोलताना राज्यात येत्या १५ दिवसांत आचारसंहिता लागू होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळेच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सध्या महायुतीकडून अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे, तर भाजप धार्मिक मुद्द्यांवर जोर देत आहे. नितेश राणे यांच्या धार्मिक वक्तव्यांमुळे भाजप चर्चेत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्याकडून शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांचे सुरू आहेत.
दरम्यान, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र देखील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीत आहेत. शिंदे गटाने आता ‘धर्मजागरण यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेद्वारे शिंदे पितापुत्रांनी खेडोपाड्यात जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रचार करण्याचे ठरवले आहे.
धर्मजागरण यात्रेला कोल्हापुरात अंबाबाई देवस्थानात दर्शन सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेनेचा हा प्रयत्न पारंपारिक लोककला, दिंडी, काढून जनतेपर्यंत पोहचण्याचा आहे. तसेच या माध्यमातून मतदारांना हिंदू धर्म आणि पारंपरिक संस्कृतीचे महत्व पटवून देण्याचा उद्देश शिवसेनेचा आहे. विरोधकांचे असे म्हणणे आहे की भाजप शिंदे आणि अजित पवार यांचा फक्त उपयोग करून घेत आहे. याचसोबत आता एकनाथ शिंदे धर्मजागरण यात्रा काढून भाजपला अडचणीत आणण्याच्या तयारीत आहेत का ? असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा अतिशय महत्वाची मानली जात आहे. शिंदे यांचा पक्षाच्या राजकीय अस्तित्वाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चुरशीच्या घटना घडू शकतात.