इस्रायल (Israel) आणि हिज्बुल्लाह (Hezbollah) यांच्यात सध्या चालू असलेल्या गंभीर संघर्षामुळे लेबनॉनच्या सीमेवर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी रॉकेट आणि मिसाइल्सचा वापर सुरू आहे, तसेच या भागात मोठ्या प्रमाणात बॉम्बचा देखील वापर केला जात आहे. आतापर्यंत लेबनानमध्ये 1600 हून अधिक हल्ले इस्रायल डिफेन्स फोर्सने केलेले आहेत. तसेच हिज्बुल्लाहची 1200 हून जास्त ठिकाणे एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्थ केल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात 2000 लोक जखमी झाले असून 492 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, लेबनॉनच्या जनतेशी आमच कुठलही शत्रुत्व नाही असे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu)म्हणाले आहेत.
इस्रायलने लेबनॉनवर केलेला हल्ला अतिशय भयंकर आणि विध्वंसक असून या हल्ल्यामुळे अमेरिका आणि अरब राष्ट्रांमध्ये देखील तणाव वाढत चालला आहे. हिज्बुल्लाहचे अंडरग्राऊंड तळ देखील या हल्ल्यात नष्ट झाले आहे. इस्रायलने हल्ला करण्याआधी हिज्बुल्लाह इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत होता परंतु मोसादच्या इनपुटच्या आधारावर IDF ने त्यांचे रॉकेट आणि मिसाइल लॉन्चिंग साइट नष्ट करून हिज्बुल्लाहचा हल्ला अयशस्वी केला आहे.
इस्रायलवर हिज्बुल्लाहने याआधी हल्ले केले आहेत. यामुळेच आता इस्रायलने त्या हल्ल्यांचा बदला घेतलेला आहे. 3DR मिसाइलने हिज्बुल्लाह हल्ला करणार असल्याची माहिती इस्रायलला मिळाली होती. त्यानंतर इस्रायलने हा हल्ला केला, आणि त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले.