Crime News Update : महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत अक्षय शिंदेला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर या शाळेशी संबंधित दोन फरार आरोपींनी त्वरित अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, अटकपूर्व जामीनाची याचिका दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने ती फेटाळली, याचीका फेटाळल्यानंतर त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. काल पोलीस त्याला न्यायालयीन चौकशीसाठी व्हॅनमधून नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि फायरिंग केले, अशापरिस्थितीत पोलिसांना आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार करावा लागला ज्यात अक्षयचा मृत्यू झाला. असे सांगण्यात येत आहे.
काल अक्षय शिंदेचा एन्काऊंटर होताच शाळेशी संबंधित फरार आरोपींनी लगेच हालचाल करत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आणि पुढील सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी ही पावले उचलली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “अक्षय शिंदेवर त्याच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता आणि त्याच्या चौकशीसाठी नेले जात असताना त्याने पोलिसावर गोळी झाडली. पोलिसांनी आत्मसंरक्षणात गोळीबार केला. यावर कोणत्याही प्रकारची राजकारण करणे योग्य नाही.”
दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य करत सांगितले, “अक्षय शिंदेने पोलिसाची बंदूक हिसकावून गोळीबार केला, ज्यामुळे पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला.”