Amit Shah : झारखंडमधून बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर आता बांगलादेशातून प्रतिक्रिया आली आहे. बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने अमित शहांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना निषेध पत्र सादर केले आहे. या पत्राद्वारे बांगलादेशने आपला आक्षेप आणि नाराजी व्यक्त केली आहे.
बांगलादेशने यावर जोर दिला की, ‘शेजारील देशातील नागरिकांविरुद्ध जबाबदार पदांवरून येणारी अशी विधाने दोन्ही मित्र देशांमधील परस्पर आदर आणि समजूतदारपणाची भावना कमकुवत करतात.’
शुक्रवारी, गृहमंत्र्यांनी झारखंडमधील जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारवर मत बँकेच्या राजकारणासाठी बेकायदेशीर घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. हे थांबवले नाही तर येत्या 25-30 वर्षांत असे स्थलांतरित बहुसंख्य होतील, असा इशारा त्यांनी दिला.
घुसखोरांबद्दल नेमके काय म्हणाले शाह?
बोकारो येथील सभेत बोलताना शहा म्हणाले, ‘राज्यात घुसखोरांना जागा नाही. ते आमच्या मुलींसोबत लग्न करून जमिनी बळकावत आहेत आणि समृद्ध आदिवासी संस्कृतीचा वारसा नष्ट करत आहेत. जर असेच चालू राहिले तर येत्या 20-25 वर्षांत हे घुसखोर येथे बहुसंख्य होतील. काँग्रेस आणि हेमंत सोरेन त्यांना रोखू शकत नाहीत कारण ते वोट बँकेचे राजकारण करतात. पुढे ते म्हणाले, एकदा सत्ता द्या आणि बघा. आम्ही प्रत्येक घुसखोराला हाकलून देऊ.’ घुसखोरांमुळे संथाल परगणा विभागातील आदिवासी लोकसंख्या 44 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर आली असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी यावेळी केला.
भारतात घुसखोर बांगलादेशींची संख्या?
बांगलादेशच्या सीमा भारतातील अनेक राज्यांना लागून आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशातून घुसखोरांचा बेकायदेशीर प्रवेश हा बराच काळापासून राजकीय मुद्दा आहे. यावर नेहमीच वाद होत आले आहेत. भारतात बांगलादेशी घुसखोरांची संख्या २ कोटी असल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, दोन दशकांपूर्वी 2004 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री प्रकाश जयस्वाल यांनी संसदेत सांगितले होते की, भारतात 1.2 कोटीहून अधिक अवैध बांगलादेशी आहेत. मात्र, पश्चिम बंगाल आणि आसाम सरकारच्या टीकेनंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. 2016 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते, ‘माहितीनुसार, बांगलादेशातून भारतात 2 कोटी अवैध स्थलांतरित आहेत.’