मराठवाडा, विदर्भ , मध्य महाराष्ट्र, कोकण आणि इतर काही ठिकाणी येत्या 3, 4 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली (Maharashtra Weather Update) जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा 24 तासांत तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होऊन मुसळधार पाऊस (Rain) पडणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
याचसोबत पुणे जिल्ह्याला राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये सोमवारी वादळी वारे, विजांचा कडकडाट करत पावसाने हजेरी लावली होती. तसेच नगर जिल्ह्यात देखील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज पासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडणार आहे.