महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व (MPSC )परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येईल. महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश करावा अशी मागणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती आता त्यांच्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये केला आहे.
या परीक्षेबाबत ट्वीट करत आयोगाने 1 डिसेंबरला ही परीक्षा होणार असल्याची माहिती दिली आहे. आयोगाने 29 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 साठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून महाराष्ट्र कृषी सेवा- 2024 करिता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले होते . महाराष्ट्र कृषी सेवेतील या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. यामुळेच शासनाकडून आयोगाला याबाबत विनंती करण्यात आली होती.
आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले की,21 दिवसांचा कालावधी उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या तसेच प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी या सर्व बाबी विचारात घेऊन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
याचसोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम, इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिया या गोष्टींचा विचार करून 1 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 चे आयोजन करण्यात येणार आहे.