Sindhudurg : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ही घटना 26 ऑगस्ट रोजी घडली होती. त्यांनंतर राज्यभरातून यावर निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे.
राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सरकारवर टीका करण्यात आली. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईगडबडीत उभारण्यात आल्याचे म्हंटले.
दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने पुन्हा नव्याने शिवपुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.