महायुतीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024) पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आज बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील 46 जागांचे वाटप निश्चित करण्यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज अमित शाह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या जागावाटपावर बैठक होणार आहे. महायुतीच्या नेतृत्वात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी असल्याने जागावाटपाचा मुद्दा अतिशय चर्चेचा ठरत आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून 38 जागा जिंकल्या होत्या, परंतु यंदा अजित पवार यांच्या गटाकडून देखील 8 जागांची मागणी होत आहे यामुळे आता जागा वाटपाच्या मुद्द्यात पेच निर्माण होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीत विभागनिहाय जागावाटपावर चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप- प्रत्यारोप टाळण्यासाठी या बैठकीत होणारी चर्चा अंतिम निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरेल असे म्हटले जात आहे. या बैठकीनंतर राज्यातील अन्य जागावाटपावरही विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी ही बैठक आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, अमित शाह बुधवारी घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेणार होते आणि त्यानंतर नाशिकला जाणार होते. परंतु महायुतीची अचानक बैठक बोलावल्यामुळे त्यांनी घृष्णेश्वर दर्शन रद्द केले आहे.