सध्या सोशल मिडियावर मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदराची पिल्ले असल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील (Mumbai )सिद्धीविनायक मंदिरातील (Shree Siddhivinayak Temple) आहे असे आरोप करण्यात येत आहेत. यामुळे आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छता आणि शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, हे प्रकरण ताजे असतानाच आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडूंवर उंदराची पिल्ले फिरताना दिसून आली.
सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्ले दिसून येत आहेत. मात्र, सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून हे आरोप खोटे असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर मंदिराच्या आतील बाजूचा हा व्हिडिओ आहे असे दिसून येत नाही असे मंदिराच्या प्रशासनाकसून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट (SSGT) चे अध्यक्ष सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हंटले, “महाप्रसाद बनवण्यात येणारी जागा नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. ही जागा अतिशय स्वच्छ आहे. येथे तूप, काजू आणि जे काही तयार केले जाते ते सर्वप्रथम बीएमसीच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले जाते. व्हायरल होणारा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अजूनही समोर आलेले नाही. पण हा व्हायरल होणारा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नक्कीच नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील (Veena Patil) यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्ले फिरत असल्याचे आरोप फेटाळून लावलेले आहेत. “आम्ही या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंची तपासणी करू. मात्र, सिद्धिविनायक मंदिरात नेहमीच स्वच्छतेची काळजी घेतली जाते. आम्ही या व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंची तपासणी करत आहोत. यासाठी आम्ही सर्व कॅमेरे तपासले असून यामध्ये अद्याप काहीही आढळून आलेले नाही.”असे त्यांनी स्पष्ट केले आहे.