मुंबईकरांसाठी (Mumbai ) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची सेवा लवकरच सुरु होणार आहेत. मुंबई मेट्रो 3 चा भूयारी मार्ग कुलाबा-वांद्रे-सीप्झ यांच्यादरम्यानचा आहे, यासाठी बीकेसी ते आरे कॉलनी या 12.5 किमीच्या मार्गावर 10 स्थानके असतील. या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असे मेट्रो मॅनेजमेंटकडून जाहीर करण्यात आले आहे.
हा मेट्रो मार्ग मुंबईतील प्रमुख व्यावसायिक क्षेत्रे, रुग्णालये, आणि शैक्षणिक संस्थांना जोडला जाणार आहे. या मार्गावर एकूण 27 स्थानके असतील, ज्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांचा समावेश आहे. मेट्रोची गती 65 किमी प्रतितास असेल, तसेच मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेट्रोचे नियंत्रण कक्ष आणि स्थानकांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे सीसीटीव्ही, एक्सलेटर, आणि फुल स्क्रीन डोअर असतील, जे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.
दुसऱ्या टप्प्याचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, ज्यात वरळी आणि गिरगांव सारख्या मोठ्या स्थानकांचा समावेश आहे. यातील तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी 10 ते 50 रुपये असेल, जे नंतर वाढून 70 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मुंबई मेट्रोच्या या नव्या प्रवासामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यात मदत होईल, ज्यामुळे आता मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे.