दिल्ली विमानतळाच्या (Delhi Airport) टर्मिनल 1 ते टर्मिनल 2/3 पर्यंतचा प्रवास प्रवाशांसाठी अतिशय त्रासदायक झाला होता. ट्रॅफिक जॅममुळे लोकांना योग्य त्या टर्मिनल्सवर वेळेवर पोहचण्यासाठी उशीर होत होता. यामुळे काही प्रवाशांची फ्लाइट देखील चुकत होती. यामुळेच आता दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2/3 दरम्यानचा प्रवास सुलभ बनवण्यासाठी ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) सुरू करण्याचा निर्णय इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने घेतलेला आहे. याच्या माध्यमातून टर्मिनल वन, टू आणि थ्री एरोसिटी आणि कार्गो सिटीला जोडले जाणार आहेत. यामुळेच आता दिल्लीमध्ये प्रवाशांना एअर ट्रेनची सुविधा मिळणार आहे.
हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 आणि टर्मिनल 2 च्या एका बाजूला आणि टर्मिनल 1 च्या दुसऱ्या बाजूला ही एअर ट्रेन धावणार आहे. या एअर ट्रेनला चार थांबे असतील. या एअर ट्रेनचा ट्रॅक 7.7 किलोमीटर लांबीचा असणार आहे . या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. याआधी शिकागो, शांघाय आणि फ्रँकफर्टमध्येही एअर ट्रेनची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केलेली आहे. दिल्लीमध्ये होणारी एअर ट्रेन हि भारतातील पहिली एअर ट्रेन असणार आहे.
ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या प्रकल्पाचा लिलाव होऊ शकतो असे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात सांगितलेले आहे. 2027 मध्ये याचे काम पूर्ण होणार आहे. दिल्ली विमानतळावरील एअर ट्रेनद्वारे 2027 पासून प्रवाशांना एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जाता येणार आहे. दरम्यान, महत्वाचे म्हणजे जगात जिथे एअर ट्रेनची सुविधा आहे तिथे कुठेच प्रवाशांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाहीत. तसेच दिल्ली विमानतळावरील एअर ट्रेनच्या सुविधेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत आणि ही एअर ट्रेन प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे.