आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024) पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांना पत्रक देखील वाटलेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पूर्ण क्षमतेने अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढायची आहे असे या पत्रकात लिहिलेले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकत नाही, तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही असे देखील या पत्रकात लिहिलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतच्या अनेक सूचना आणि नियोजन तसेच त्यासाठी लागणारे मार्गदर्शन हे देखील कार्यकर्त्यांना या पत्रकात लेखी स्वरुपात देण्यात आलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे महिला व तरुणांच्या मतांवर अधिक लक्ष असणार आहे. लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी वाढवण्यावर देखील भर दिला जाणार असून या योजनांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे असे देखील या बैठकीत सांगण्यात आले आहे.
आज संवाद बैठक पार पडली असून, लवकरच नागपुरात पुढील आढावा बैठक घेण्यात येणार आहे. मात्र, या बैठकीला नितीन गडकरी (Nitin Gadkari) उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळेच राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते असूनही गडकरी आढावा बैठकीला उपस्थित राहणार नाहीत यावरून अनेक चर्चांना उधाण आले आहे, तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीतून लांब ठेवले जात आहे का? असे प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.