गुजरातमधून (Gujarat) अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात आज सकाळी भयानक अपघात (Accident ) घडला आहे. मागून प्रचंड वेगात कार येऊन पुढे जात असणाऱ्या ट्रकमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यु झाला असून या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या कारमधील सर्व जण शामलाजी येथून अहमदाबादला जात होते. पोलीस हा अपघात कसा झाला याचा तपास करत आहेत.
हा अपघात कार चालकाचा डोळा लागल्याने झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारमध्ये एकूण 8 जण होते. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी जखमींची ओळख पटवून मृतांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळवलेली आहे. हा अपघात घडला तेव्हा कारचा स्पीड अंदाजे 120 किमी प्रतितास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागून येणारी कार पुढे असणाऱ्या ट्रकला धडकल्याने कारचा पुढील भाग ट्रकमध्ये घुसला होता. फायर विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी कारचा पत्रा कापून त्यातील मृतदेहांना बाहेर काढलेले आहे. या घटनेची संपूर्ण माहिती एसपी विजय पटेल यांनी दिलेली आहे. गाडीमधून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहेत. या अपघातातील जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कारमधील जखमी आणि मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे असे एसपी विजय पटेल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा अपघात कार चालकाची झोप लागल्याने झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.