Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहित पाच महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. तसेच तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा असल्याचे देखील म्हंटले आहे. केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘आपण हे पत्र राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत नसून एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे. पत्रात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोहन भागवत देतील अशी आशा व्यक्त करतो.’
केजरीवाल यांनी पात्रात लिहिले की, ‘भाजपचे सरकार देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते संपूर्ण देशासाठी घातक आहे. असेच चालू राहिले तर आपली लोकशाही संपेल, आपला देश संपेल. पक्ष येतील आणि जातील, निवडणुका येतील आणि जातील, नेते येतील आणि जातील, परंतु भारत नेहमीच देश राहील. या देशाचा तिरंगा सदैव स्वाभिमानाने आकाशात फडकत राहावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
केजरीवाल म्हणाले की, ‘आमचा उद्देश फक्त भारतीय लोकशाही वाचवणे आणि मजबूत करणे हा आहे. पुढे त्यांनी लिहिले, ‘मी जे प्रश्न विचारत आहे ते सर्व जनतेच्या मनातील आहेत. ईडी-सीबीआयच्या जोरावर इतर पक्षांच्या नेत्यांचा पराभव केला जात आहे आणि सरकार पाडले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. अप्रामाणिकपणाने सत्ता मिळवणे तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी भागवत यांना केला.
दुसऱ्या प्रश्नात केजरीवाल म्हणाले की, ‘पंतप्रधान आणि अमित शहा ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत होते, त्यांचा काही दिवसांनी भाजपमध्ये समावेश झाला. तुम्ही किंवा संघ कार्यकर्त्यांनी अशी कल्पना केली होती का? हे सगळं बघून तुम्हाला त्रास होत नाही का? तिसऱ्या प्रश्नात केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, पंतप्रधानांना हे सर्व करण्यापासून तुम्ही कधी रोखले का? भाजपचा गोंधळ उडाला तर त्यांना योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी आरएसएसची असल्याचे देखील केजरीवाल यांनी आपल्या पात्रात लिहिले.
चौथ्या प्रश्नात केजरीवाल म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेपी नड्डा जी म्हणाले की, भाजपला आता आरएसएसची गरज नाही. मला कळाले की, नड्डाजींच्या या विधानाने प्रत्येक संघ कार्यकर्ता दुखावला आहे. पण यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. केजरीवाल यांनी शेवटच्या प्रश्नात पीएम मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्तीचा कायदा करून अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांसारखे शक्तिशाली नेते निवृत्त झाले. तो कायदा मोदींना लागू होणार नाही, तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कायदे सर्वांसाठी सारखेच नसावेत का? असे प्रश्न केजरीवालांनी यावेळी उपस्थित केले. ते पत्रात पुढे म्हणाले, ‘हे प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात चमकत आहेत. तुम्ही या प्रश्नांचा विचार कराल आणि जनतेला या प्रश्नांची उत्तरे द्याल अशी मला मनापासून अपेक्षा आहे.’