Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच अक्षय शिंदे याच्या वडिलांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी माझ्या मुलाची हत्या करण्यात अली असल्याचा आरोप करत अक्षयच्या वडिलांनी तातडीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. (मुलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर उपाय शोधण्यासाठी पीडित व्यक्ती (व्यक्तींकडून) रिट याचिका दाखल केली जाऊ शकते.) आज या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेने पिस्तुल हिसकवल्याच्या आरोपावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचे म्हणत अनेक प्रश्न उपस्थित केले. न्यायालयात नेमकं काय घडलं?, जाणून घ्या…
या याचिकेत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी सांगितले की, ‘या प्रकरणातील सहा आरोपी अद्यापही फरार आहेत आणि ते देखील तितकेच जबाबदार आहेत. माझ्या मुलावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. माझा मुलगा राजकारणाचा बळी ठरला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप केला आहे. अक्षयचे वकील अमित कटरनवरे यांच्याकडून हा खून असल्याचा आरोप केला जात आहे, नजीकच्या काळात निवडणुका असल्याने हा सत्ताधाऱ्यांच्या आदेशामुळे झालेला खून असल्याचे म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘अशा पद्धतीच्या घटनांमुळे आपण पोलिसांना या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देतो, असा त्याचा अर्थ निघतो. मग कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी आहे. देवाचा न्याय अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांना प्रोत्साहन दिलं जात आहे. जे न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. हे प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.
न्यायालयाने कोणते प्रश्न उपस्थित केले
न्यायमूर्ती – गोळी कुठे लागली?
सरकारी वकील – त्याच्या डोक्यात
न्यायमूर्ती – पिस्तुल होती की रिव्हॉल्व्हर?
सरकारी वकील – पिस्तुल होती.
न्यायमूर्तीनी न्यायालयात उपस्थित केलेले प्रश्न…
-पिस्तुल कशी वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? पिस्तुल वापरणे सोपे नाही. तुम्ही कधी वापरली आहे का? तुम्ही जे सांगताय ते खरं नाही. सामान्य माणूस ताकदीशिवाय पिस्तुल वापरू शकत नाही. आरोपी तुमच्याकडून पिस्तुल कशी घेऊ शकतो? तुम्ही इतके निष्काळजी कसे असू शकता? इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपीबाबत दुर्लक्ष झालंय. अक्षयने चालवलेली गोळी उलटी येऊन कोणाला लागली कशी नाही? ही गोळी फायर केल्यानंतर वर उडते आणि परत येऊन एखाद्याला लागते. ही न पटण्यासारखी गोष्ट आहे.
-पिस्तुलावर आरोपीच्या हाताच्या खुणा असायला हव्यात. याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा. आरोपीने तीन बुलेट झाडल्या असे सांगत आहात. तर एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत? पोलिसांनी गोळी झाडताना आरोपीच्या पायावर किंवा हातावर का झाडली नाही?
-ज्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी मारली, त्याने कमरेच्या खाली गोळी मारायला हवी होती. ते कितीच्या बँचचे पोलीस अधिकारी आहेत. १९९२ च्या बँचचे पोलीस अधिकारी आहेत का?
-हा एन्काऊंटर म्हणता येणार नाही. हे एन्काऊंटर नाहीच.
-आणखी एक पैलू आहे. आरोपीला लांबून किंवा पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळी घातली गेली. याचा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवा. तसेच आरोपीला गोळी झाडल्यानंतर ती गोळी उजव्या बाजूने बाहेर आली, त्यानंतर गोळी कुठे लागली? या घटनेमध्ये पोलिसांचा सहभाग असेल तरी निःपक्षपाती तपास हवा.
-आम्हाला कोणत्याही गोष्टीवर संशय नाही, आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. असेही न्यायालयाने म्हंटले आहे.
-गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला तुम्ही घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का झाला? SOP म्हणजे काय? त्याला बेड्या घातल्या होत्या का? (पाणी मागितल्यावर बेड्या काढण्यात आल्याचे सरकारी अधिवक्त्यांनी सांगितले)
-तुम्ही पिस्तुलावरील बोटांचे ठसे घेतले का? तुम्ही म्हणालात की, आरोपींनी पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये एकच पोलीस कसा जखमी झाला? सामान्यतः आपण स्वसंरक्षणासाठी पायावर गोळी झाडतो. कोणीही सहसा स्वसंरक्षणासाठी कुठे गोळीबार करतो? हात किंवा पाय असू शकतो.
-चार अधिकारी आणि अक्षय असे पाच जणं वाहनात होते. वाहनात चार अधिकारी असताना ते एका माणसावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, यावर विश्वास कसा ठेवायचा? (सरकारी वकील – ही तात्काळ प्रतिक्रिया होती.) ते टाळता आले नसते का? पोलीस प्रशिक्षित आहेत, सामान्य माणसालाही माहीत आहे की, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी कुठे गोळीबार करावा.