केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (२५ सप्टेंबर) कोल्हापुर दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची ही बैठक अतिशय महत्त्वाची मनाली जात आहे. तसेच आता इचलकरंजीतील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
दरम्यान, ताराराणी पक्षाकडून प्रकाश आवाडे यांनी राहुल आवाडे यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून (Ichalkaranji Vidhan Sabha) उमेदवारी दिली होती. तसेच जयश्री कुरणे यांना देखील हातणंगले मतदारसंघांमधून उमेदवारी देण्यात आली होती परंतु आता प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे उमेदवारी कायम राहणार की उमेदवारी मागे घेतली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रकाश आवाडे यांचा हा भाजप प्रवेश इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या आंतरिक गोंधळाला थांबवू शकेल का, याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
आता यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, कारण ते प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. सुरेश हाळवणकर आता यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रकाश आवाडे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, “उमेदवारी मागायला कोणाकडे जाणार नाही,” त्यामुळे त्यांनी तरतूद केलेल्या उमेदवारांची आगामी विधानसभा निवडणुकीत भूमिका काय राहील, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपमध्ये सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयाने इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांतील गोंधळ कमी होईल का, याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.