मराठा समाजासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे . जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात त्यांचे उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा नववा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावली आहे. डॉक्टर आणि मराठा बांधवांनी विनंती केल्यानंतर मध्यरात्री मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार झाले. यानंतर उपोषणस्थळी अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. यामुळेच उपस्थित मराठा बांधवांना विचारून त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की , आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठे करू नका, एकाही नेत्याच्या प्रचार सभेला जाऊ नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. याचसोबत पुढे बोलताना ते म्हणाले आहेत की, मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार असून 10- 12 दिवस आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.यामुळेच दवाखान्यात येऊन कोणी गर्दी करू नका. उपचार झाल्यानंतर अंतरवलीला आलो की भेटू.
आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही, ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, असे वक्तव्य देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आगामी निवडणुकीपर्यंत आरक्षण दिले नाही तर निवडणूक बिघडवणार आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच मी माझ्या स्वतःसाठी हे आंदोलन करत नाही असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत आणि हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
दरम्यान, मराठा समाजासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज ४ ते ५ च्या दरम्यान उपोषण सोडणार आहेत.