दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Vidhansabha Elections 2024)फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आत्तापासूनच निवडणुकीची तयारी केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी भाजप नेत्यांची राजस्थानातील रणथंबोर येथे 28 आणि 29 सप्टेंबर रोजी विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, दिल्ली भाजपचे सर्व आमदार आणि खासदार, भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बीएल संतोष तसेच तिन्ही प्रदेश सरचिटणीस देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
याचसोबत या बैठकीत भाजपचे अधिकारी अरुण कुमार, आरएसएसचे सह-शासकीय पदाधिकारी तसेच दिल्लीचे क्षेत्र प्रचारक जतिन कुमार आणि राज्य प्रचारक देखील सहभाग नोंदवणार आहेत. रणथंबोर येथे 28 आणि 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या विचारमंथन बैठकीत तिकीट वाटप करताना कोणती विशेष काळजी घ्यावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या नेत्यांना बुथ स्तरापर्यंत कसे सक्रिय करायचे यावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच या विचारमंथन बैठकीत अनेक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना मतदानासाठी कसे प्रोत्साहित करता येईल यावर देखील चर्चा होणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये जनता भाजपला निवडून देईल असा विश्वास दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी व्यक्त केलेला आहे.