Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अब्रुनुकसानीच्या (Defamation) खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले असून, कोर्टाने त्यांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी गेल्या काही महिन्यापासून सुनावणी सुरू होती. दरम्यान, आता कोर्टाने निकाल दिला असून संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे.
या प्रकरणी न्यायालयाने संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात आयपीसी सेक्शन ५०० अंतर्गत ही याचिका दाखल केली होती. ज्यावर आज सुनावणी पार पडली.
नेमकं प्रकरण काय?
मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेले वक्तव्य बदनामीकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत असे देखील मेधा यांनी याचिकेत म्हंटले आहे. मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात संजय राऊत यांना नोटीस बजावण्याची विनंती केली. तसेच संजय राऊत यांच्यावर मानहानीची कारवाई करण्याची मागणी केली होती. मेधा सोमय्या यांच्या याच याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून, संजय राऊत दोषी आढळले आहेत.