Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून, आता तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच आता भाजपने (BJP) देखील कंबर कसली असून, आजपासून जम्मू भागात आपले फायर ब्रँड नेते मैदानात उतरवले आहेत. यापैकी एक नाव आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath). मुख्यमंत्री योगी यांनी आज जम्मू भागात तीन सभा घेतल्या.
योगी आदित्यनाथ यांची पहिली रॅली आज दुपारी 12 वाजता जम्मूच्या छंब विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यानंतर दुपारी दीड वाजता ते रामगड विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार करताना दिसले. तर तिसरी रॅली आरएस पुरा दक्षिण जम्मूमध्ये सुरु आहे.
तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या चार हिंदूबहुल (बहुसंख्येने हिंदु असणारे) जिल्ह्यांपैकी जम्मू, सांबा, कठुआ आणि उधमपूर हे जिल्हे भाजपचे गड मानले जातात. भाजपने आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत करत या रॅलींचे आयोजन केले आहे.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील आज जम्मूत दोन रॅलींना संबोधित करताना दिसल्या. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी शनिवारी जम्मू शहरात मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान
तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 40 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये बांदीपोरा, उधमपूर, कुपवाडा, सांबा, बारामुल्ला, कठुआ आणि जम्मू या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत या भागात भाजपला बहुमत मिळाले होते.
पहिल्या टप्प्यात 24 तर दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर मतदान झाले आहे. आतापर्यंत गंदरबल, पुंछ, श्रीनगर, राजौरी, बडगाम, रियासी, किश्तवाड, रामबन, डोडा, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा, शोपियान येथे मतदान झाले आहे. तर याचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहेत.