संजय राऊत (Sanjay Raut) यांना माझगाव सत्र न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दिलासा दिला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून, 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली गेली आहे. यापूर्वी, राऊत यांना दोषी ठरवून 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी अर्ज केला होता, जो आता मान्य करण्यात आला आहे. यामुळे संजय राऊत यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.
हे प्रकरण मीरा-भाईंदर महापालिकेतल्या 154 सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामांचे आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या(Medha Somaiya) यांच्या युवा प्रतिष्ठानने 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मिळवले होते. संजय राऊत यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते, ज्यात मेधा सोमय्या यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून महापालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. यावरूनच संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येत होता. या प्रकरणात कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवले होते परंतु आता त्यांना जामीन मिळाला आहे.
संजय राऊतांच्या शिक्षेला स्थगिती मिळू शकते का? असा प्रश्न विचारण्यात येत होता. या प्रश्नावर आता ॲड. असीम सरोदे यांनी कायद्यातील तरतूदी सांगितलेल्या आहेत. असीम सरोदे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, राऊत यांच्या शिक्षेला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. “कायद्यानुसार, न्यायालयात अपील केल्यावर शिक्षेवर स्थगिती दिली जाऊ शकते. त्यामुळे राऊत यांना अपील करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे” असे असीम सरोदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, या प्रकरणात न्यायालयाने 30 दिवसांच्या आत अपील करण्याची मुभा दिली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना झालेल्या 25000 रुपयाचा दंड आणि 15 दिवसांच्या शिक्षेला स्थगिती मिळू शकते तसेच पुढची कायद्याची प्रक्रिया ही सुरु राहणार असल्याचे देखील असीम सरोदे यांनी सांगितले आहे.