Bangladesh Army : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर संपूर्ण देशात इस्लामीकरण वाढले आहे. सरकार तर सोडा, आता बांगलादेशच्या लष्करानेही कट्टरतावाद्यांसमोर शरणागती पत्करलेली दिसते आहे. बांगलादेशातील महिला सैनिकांना आता हिजाब घालण्याची परवानगी देण्यात अली आहे. खरं तर जेव्हा 2000 साली बांगलादेशने लष्करात महिलांचा समावेश केला, तेव्हापासून लष्करात हिजाब घालण्यास मनाई होती. मात्र, आता कट्टरवाद्यांच्या दबावाखाली बांगलादेश लष्कराने आपले नियम बदलले आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, जर महिला सैनिकांना हिजाब घालायचा असेल तर त्या आता हिजाब घालू शकतात. याबाबतचा आदेश महाअधिवक्ता कार्यालयाकडून जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता महिला लष्करी कर्मचाऱ्यांसाठी हिजाब घालणे ऐच्छिक करण्यात आले आहे. आता बांगलादेशमध्ये महिला अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि इतर लष्करी कर्मचाऱ्यांना हिजाबवरील बंदी हटवण्यात आली आहे. ॲडज्युटंट जनरलच्या कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, ‘3 सप्टेंबर रोजी झालेल्या PSO परिषदेत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये इच्छुक महिला कर्मचाऱ्यांना गणवेशासह हिजाब घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.’
बांगलादेशमध्ये 2000 साली लष्करात महिलांचा समावेश करण्यात आला होता, त्यानंतर आतापर्यंत महिलांना गणवेशासह हिजाब घालण्याची परवानगी नव्हती. मात्र, ॲडज्युटंट ऑफिसने आता वेगवेगळ्या गणवेशांसोबत (कॉम्बॅट युनिफॉर्म, वर्किंग युनिफॉर्म आणि साडी) हिजाबचे नमुनेही द्यावेत असे निर्देश दिले आहेत. हिजाबच्या नमुन्यात फॅब्रिक, रंग आणि आकार देखील समाविष्ट केला आहे. तसेच, प्रस्तावित हिजाब परिधान केलेले महिला लष्करी जवानांचे रंगीत फोटो 26 सप्टेंबरपर्यंत संबंधित विभागाला पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.