मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन विदर्भच्या’ मार्फत रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ते अमरावती दौऱ्यावर जाणार असून, यावेळी विदर्भातील 11 जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत ते पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ याठिकाणी आढावा 27 तारखेला घेणार असून 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.
राज ठाकरे यांचे अमरावतीत आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे विदर्भातील नेत्यांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने यापूर्वीच 7 उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांमध्ये शिवडीच्या बाळा नांदगावकर, पंढरपूरचे दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणचे संतोष नागरगोजे, चंद्रपूरचे मनदीप रोडे, हिंगोलीतून बंडू कुटे, राजुराचे सचिन भोयर, वणीचे राजू उंबरकर यांचा समावेश आहे.
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता, परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांना विदर्भ, मराठवाडा आणि सोलापूरच्या दौऱ्याद्वारे मतदानाच्या बाबतीत व्यापक संपर्क साधण्याची संधी मिळत आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेऊन संदीप देशपांडे यांना पाठिंबा दिलेला आहे.