उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एका विद्यार्थ्याला धनबादमधील आयआयटीमध्ये जागा देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांने फी भरण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत फी भरली नव्हती. तो शेवटच्या दिवशी फी भरायला गेला परंतु पोर्टल हँग झाल्याने त्याला फी जमा करता आली नाही. यामुळे त्याला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळाला नाही . या विद्यार्थ्यांचे नाव अतुल असे आहे. याने झारखंडच्या विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क केला आणि याबाबत त्यांना मदत मागितली परंतु JEE परीक्षा IIT मद्रास द्वारे घेतली जाते, त्यामुळे त्याने चेन्नईमध्ये मदत घ्यावी असे त्याला त्यांच्याकडून सांगण्यात आले. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) अतुलने मदत मागितली आहे.
या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी आयआयटी धनबादची सरकारी वेबसाइट चालवणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला आणि आयआयटीच्या संयुक्त जागा वाटप प्राधिकरणाचे अध्यक्ष यांना नोटीस बजावलेल्या आहेत.
न्यायालयाला हे सर्व प्रकरण जाणून घेयचे असून याबाबत न्यायालयाकडून आदेश काढण्यात आले आहेत. या विद्यार्थ्याला प्रवेश कसा मिळवून देता येईल ? याकडेच न्यायालयाचे लक्ष आहे. याबाबत सर्व माहिती आयआयटीच्या संयुक्त जागा वाटप प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्याकडून न्यायालयाने मागवून घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणावर सोमवारी (३० सप्टेंबर २०२४) रोजी सुनावणी होणार आहे.
आता या सुनावणीत न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जाणार ? या विद्यार्थ्याला आयआयटीमध्ये प्रवेश दिला जाणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.