Assembly Elections : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा (Assembly Election 2024Schedule) घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) 14 जणांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात राज्यातील विविध राजकीय पक्ष, पोलीस तसेच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन निवडणूक संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
निवडणूक आयोगाचे पथक सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकाळी दहा वाजता बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकांबाबत चर्चा होणार आहेत. त्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक घेतील. तर दुपारी तीन वाजता निवडणुकांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांशी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला जाईल आणि त्यांना काही सूचना दिल्या जातील. तर शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल.
काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात निवणुका लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अशास्थितीत महाराष्ट्रात 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.